चैन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी वापरलेली भाषा ही नरसंहाराकडे इशारा करते आणि असं विधान हेट स्पीचच्या श्रेणीत येतं, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
याबाबत सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले की, जर सनातन धर्माचं पालन करणारे लोक अस्तित्वातच राहत कामा नये, असं म्हटलं गेलं तर त्यासाठी नरसंहार हा योग्य शब्द ठरतो. जर सनातन धर्माला एक धर्म मानलं गेलं, तर असं विधान रिलिजिसाइड अर्थात धर्माच्या विनाशाच्या श्रेणीत येतं, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.
कोर्टाने पुढे सांगितलं की, अशा प्रकारची भाषा ही कुठल्याही पद्धतीने का असेना लोकांच्या संहाराच्या दिशेने इशारा करते. त्यामध्ये इकोसाइड, फॅक्टोसाइड आणि कल्चरसाइडसारख्या शब्दांचा समावेश आहे. यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळ भाषेत वापरलेल्या सनातन ओझिप्पू या शब्दाची व्याख्या करताना कोर्टाने सांगितले की, याचा स्पष्ट अर्थ सांस्कृतिक नरसंहार किंवा संस्कृतीच्या निर्मुलनाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टनां हेट स्पीच मानता येणार नाही.
एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. तसेच उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान म्हणजे सनातन धर्माचं पालन करणाऱ्यांविरोधात नरसंहार करण्याचं आवाहन असल्याची टीका केली होती. मात्र नंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी आपलं विधान चुकीच्या पद्धतीने मांडलं गेल्याचा दावा केला होता. त्यावर सुनाावणी करताना कोर्टाने हा निवाडा दिला आहे.